Post views: counter

मार्गदर्शन मोलाचे



मार्गदर्शन मोलाचे

                            स्पर्धा परीक्षा म्हणजे एक नियमांनी खेळला जाणारा, क्षणोक्षणी उत्कंठा वाढवणारा व जय-पराजयाचे हेलकावे घेणारा खेळ आहे. कबड्डी खेळताना जसे दम सोडून चालत नाही, तसेच स्पर्धा परीक्षा देताना हिंमत बुलंद ठेवावी लागते. चांगले मार्गदर्शन हा प्रवास सोपा करू शकतो.


मार्गदर्शन का हवे?
                           करिअरचा निर्णय हा खूप महत्त्वाचा असतो. एकदा दिशा घेतली की, ती बदलणे कठीण असते. अशा वेळी विविध तज्ज्ञांशी चर्चा करून त्यांचे ज्ञान व अनुभव यांचा फायदा करून घेण्यास काहीच हरकत नाही. मग जे शैक्षणिक तज्ज्ञ आहेत, त्यांचा सल्ला घ्यावा का? तर उत्तर असे आहे की, तो निकष दुय्यम असून ज्यांना स्पर्धा परीक्षांचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष अनुभव असेल, अशांचे मार्गदर्शन मोलाचे ठरते. एखाद्या व्यक्तीला स्पर्धा परीक्षांची 'माहिती' असणे वेगळे व 'ज्ञान' असणे वेगळे. ज्ञान ही प्रक्रिया केलेली माहिती असते. ही प्रक्रिया अनुभवातून घडते. मग कोणाचे मार्गदर्शन जास्त उपयोगी पडू शकते?

यशस्वी उमेदवार:
                         यशस्वी उमेदवार हे संपूर्ण प्रक्रियेतून तावून सुलाखून पार पडलेले असतात. त्या अनुभवातून जाताना त्यांना त्यातील खाचाखोचा कळलेल्या असतात. त्यांना 'अंदर की बात' कळलेली असते, असे आपण म्हणूया. या प्रकारात दोन प्रकारचे अधिकारी मोडतात. पहिले जे काही वर्षांपूर्वी यशस्वी झाले व दुसरे जे गेल्या एक-दोन वर्षातील यशवंत आहेत. पहिल्या प्रकारातील अधिकाऱ्यांची संख्या अर्थात जास्त असते. हे अधिकारी अनेकदा 'रोल मॉडेल' म्हणून समाजापुढे असतात. त्यांच्याकडे, त्यांच्या कामाकडे बघून अनेकांना अधिकारी बनण्याची प्रेरणा मिळते. हे जुने-जाणते अधिकारी त्यांच्या कामात इतके व्यग्र असतात की, इच्छा असूनही ते पुरेसे व हमखास मार्गदर्शन करू शकत नाहीत. सर्व्हिसमध्ये सेटल झाल्यानंतर काही वर्षांनी त्यांचा स्पर्धा परीक्षांशी, अभ्यासाशी, अभ्यास पद्धतीशी संबंधही राहत नाही. तेव्हा त्यांच्याशी चर्चा करून प्रेरणा घेणे फायद्याचे होते. विषय कुठला निवडावा व मार्गदर्शन कुठून घ्यावे, याबाबत त्यांना गळ घालू नये. दुसऱ्या प्रकारचे अधिकारी म्हणजे, जे नुकतेच यशस्वी झाले आहेत. त्यांच्याकडून जास्त खोलात मार्गदर्शन मिळू शकते. त्यांच्याकडे असलेली माहितीही लेटेस्ट असते. तेही उत्साहात असतात व भरभरून बोलतात. पण यांचीही समस्या म्हणजे, ते अशा प्रकारे फार तर तीन महिने उपलब्ध असतात. एकदा त्यांचे प्रशिक्षण सुरू झाले की, संपर्क कमी होत तुटू लागतो.

यशस्वी उमेदवारांकडून प्रत्यक्ष शिक्षण:
                      कधी कधी हे झालेले यशस्वी उमेदवार चढवून वाढवून काहीच्या काही सांगतात व तयारी करणाऱ्यांना वेगळ्याच दिशेला नेतात. मी अठरा-अठरा तास अभ्यास केला, झोपायचोच नाही, पहाटे पाचलाच उठावे लागते वगैरे. प्रभावित झालेले श्रोते भक्ताच्या भूमिकेत जातात व समोरचा म्हणेल त्याप्रमाणे वागायचा प्रयत्न करून अनेकदा अडचणीत येतात. तेव्हा 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' या उक्तीवर ठाम राहणे बरे. काहींची अपेक्षा असते की, यशस्वी उमेदवारांनी विषय शिकवावे. अधिकारी सर्व्हिस जॉइन करणार की शिकवत बसणार? पुन्हा परीक्षा पास होणे व चांगले शिकवता येणे या दोन्ही गोष्टींचा संबंध नाही.

सीनिअर उमेदवार:
                    सीनिअर उमेदवार हा तर खूप जवळचा, नेहमी उपलब्ध असणारा व समजून घेणारा मार्गदर्शक ठरू शकतो. जरी ते अभ्यासाने व कधी कधी वयाने तुमच्यापेक्षा जेष्ठ असले, तरी त्यांच्याशी निकोप मैत्रीचे नाते निर्माण होऊ शकते. ही स्पर्धा परीक्षा असली, तरी आपापसातील सहकार्याने यशाची शक्यता वाढते, हे त्यांना पटलेले असते. असा एखादा सीनिअर 'मेंटॉर' म्हणून मिळाला, तर ओझे हलके होते. हा मेंटॉर फक्त परीक्षा देणाराच असेल, असे नाही; तर एखाद्या विषयात स्पेशलायझेशन असलेला प्राध्यापकही असू शकेल. पण ज्याला तुम्ही मेंटॉर म्हणून निवडाल, त्याला ही निवड मान्य हवी. या नात्याचा गैरफायदा ती व्यक्ती घेणार नाही, एवढी प्रगल्भता त्या व्यक्तीत असेल, एवढी काळजी जरूर घ्या.
                   एकदा चौकसपणे निवड करून 'मेंटॉर' निवडला की, मग छक्केपंजे नको. आपल्या अडचणीबद्दल खुलेपणे चर्चा करून त्या सोडवायचा प्रयत्न करा, मेंटॉरशी तोच निर्णय का, यावर चर्चा करायलाही हरकत नाही. पण एकाचा निर्णय घेऊन पुन्हा दुसऱ्याशी चर्चा करायला गेलात, तर मात्र तो तुमच्या मेंटॉरचा विश्वासघात आहे. शिवाय, विविध रणनीतीतील गोंधळ वाढून सोपे काम कठीण होण्याची शक्यता जास्त.

Source: www.mtonline.in

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा